PostImage

सुपर फास्ट बातमी

July 19, 2024   

PostImage

पीएम किसान योजनेतून मिळणाऱ्या रकमेत वाढ होणार !


 

 

 

बजेटमध्ये घोषणेची शक्यता

 

नवी दिल्लीः पुढच्या आठवड्यात २३ जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. या बजेटमधून केंद्र सरकार शेतकऱ्यांना मोठी भेट देण्याची शक्यता आहे. पीएम किसान सन्मान योजनेच्या रकमेत वाढ केली जाऊ शकते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार आले आहे. मात्र, हे सरकार आघाडीचं सरकार आहे. त्याचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात उमटण्याची शक्यता आहे.

 

त्याशिवाय चालू वर्षात महाराष्ट्रासह इतर काही महत्त्वाच्या राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशातील विविध घटकांना आर्थिक दिलासा दिला जाईल, अशी एक अपेक्षा आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सातत्यानं विविध क्षेत्रांशी संबंधित लोकांना भेटत आहेत. त्यांच्या अपेक्षा जाणून घेत आहेत. त्यामुळं विविध क्षेत्रांकडून वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घघेतला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पीएम किसान सन्मान निधीमध्ये सरकार २ हजार रुपयांची वाढ करू शकते असे बोलले जाते. सध्या या योजनेअंतर्गत तीन हप्त्यांमध्ये ६००० रुपये मिळतात. ही रक्कम ८ हजार रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते, असा दावा प्रसारमाध्यमांतील काही वृत्तांमध्ये करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ ११ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळतो.